नवी दिल्ली - कपिल देव, अंशुमन गायकवाड, आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीने आज टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. रवी शास्त्रीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहणार आहेत. या पदाच्या मुलाखती बीसीसीआयच्या मुख्यालयात सुरु होत्या. यादरम्यान, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नवीन प्रशिक्षकाचा कालावधी सांगितला आहे.
२०२१ मध्ये होणाऱया टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी राहणार आहे. सोबत कोचिंग स्टाफचा कार्यकाळही याच विश्वकरंडकापर्यंत असणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांच्या समितीमार्फत, कोचिंग स्टाफची नियुक्ती केली जाणार आहे.
बीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, '२०२१च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी असेल. त्यानंतर, परत एकदा मुख्य प्रशिक्षकाची निवड होईल. कारण, मोठ्या स्पर्धांसाठी हे गरजेचे आहे.'
आजच्या निवडीमध्ये सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात होते. कोचिंग स्टाफच्या सदस्यांमध्येव मात्र बदल पाहायला मिळू शकतो. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे तब्बल २००० अर्ज आले होते. त्यामधील फक्त ६ नावे निश्चित केली होती. या उमेदवारांमध्ये न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग या पाच जणांचा समावेश होता.