नवी दिल्ली - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या २०१९-२० हंगामात धडाकेबाज सुरुवात केली आहे. तीन महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबईने शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बडोद्यावर ३०९ धावांनी मात केली. मुंबईचा या हंगामातील पहिला विजय आहे. मुंबईने दिलेले ५३४ धावांचे आव्हान बडोद्याला झेपले नाही. बडोद्याचा दुसरा डाव २२४ धावांत आटोपला.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बडोद्याने ३०७ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून शम्स मुलानीने ६ बळी घेतले. बडोद्याकडून एकट्या केदार जाधवने चिवट नाबाद १६० धावांची खेळी केली.
मुंबईने आपला दुसरा डाव ४ बाद ४०९ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने द्विशतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी १६० धावा केल्या. ५३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बडोद्याची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस बडोद्याचे ३ गडी माघारी परतले होते.
अखेरच्या दिवशी अभिमन्यू सिंह राजपूत आणि दीपक हुडा यांनी कडवा प्रतिकार केला. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. राजपूतला अक्ष पारकरने बाद केले. त्यानंतर बडोद्याच्या संघाला गळती लागली आणि बडोद्याचा संघ २२४ धावांवर आटोपला.
दुसऱ्या डावात शम्स मुलानीने ४, शशांक अत्राडे-अक्ष पारकरने प्रत्येकी २ गडी बाद केले. तुषार देशपांडेने १ बळी घेतला. सामन्यात १० बळी आणि ८९ धावा करणाऱ्या शम्स मुलानीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा - India Vs West Indies : वानखेडेच्या विजयात 'हे' खेळाडू ठरले हिरो
हेही वाचा - HBD YUVI : युवराज सिंगच्या कारकीर्दीतील टॉप-५ खेळी, ज्यामुळं युवी चाहत्यांच्या स्मरणात