ढाका - बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने आगामी पाकिस्तान दौर्यासाठी नकार दिला आहे. मंगळवारी बांगलादेश संघाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
हेही वाचा - INDvsAUS : टीम इंडिया 'कमबॅक'साठी सज्ज, तर, पाहुण्यांपुढे मालिकाविजयाचे ध्येय
'मुशफिकुरने आज मला बोलवून सांगितले की तो पाकिस्तान दौऱ्यासाठी जाणार नाही. आम्ही आता त्याच्या औपचारिक पत्राची वाट पाहत आहोत. पत्र मिळाल्यानंतर आम्ही त्याला मालिकेमधून वगळणार आहोत', असे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल आबेदीन यांनी माध्यमांना सांगितले आहे. बांगलादेशला जानेवारी ते एप्रिल दरम्यान पाकिस्तान दौर्यावर तीन टी-२०, एक एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
जानेवारीत बांगलादेश-पाकिस्तानमध्ये तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सामने लाहोरमध्ये खेळवले जातील. दोन्ही संघांमधील पहिला सामना २४ जानेवारी रोजी खेळला जाईल. दुसरा आणि तिसरा टी-२० सामना अनुक्रमे २५ आणि २७ जानेवारीला खेळवला जाईल. या दोघांमधील पहिला कसोटी सामना ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रावळपिंडी येथे होईल. दुसरा कसोटी सामना एप्रिलमध्ये खेळला जाईल. ५ ते ९ एप्रिल दरम्यान हा सामना होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेचा एकमेव वनडे सामना ३ एप्रिल रोजी कराची येथे खेळवला जाणार आहे.