चेन्नई - यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर संघात सामील होणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) दिली आहे. याआधी इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्राहम थोर्प यांनी बेअरस्टो पहिल्या कसोटीनंतर संघात येईल, असे सांगितले होते.
"जॉनी बेअरस्टोची दुसर्या कसोटीत नव्हे तर तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात संघात प्रवेश करण्याची योजना आहे. तो सॅम करन आणि मार्क वूड यांच्यासमवेत सामील होईल", असे ईसीबीने सांगितले. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बेअरस्टोला विश्रांती देण्याच्या इंग्लंडच्या निर्णयावर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती. कर्णधार जो रूटनंतर श्रीलंकेतील मालिकेत तो इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बेअरस्टोने चार डावात ४६.३३ च्या सरासरीने १३९ धावा केल्या.

वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि अष्टपैलू सॅम करन यांच्यासह इंग्लंडच्या रोटेशन सिस्टमचा पहिला भाग म्हणून बेअरस्टोला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी या निर्णयाचा बचाव केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले, "मी या प्रणालीमुळे पूर्णपणे आनंदी आहे. आम्ही आत्ता याचा उपयोग करीत आहोत."
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे.
हेही वाचा - क्वारंटाइन कालावधी पूर्ण : स्टोक्स, आर्चर आणि बर्न्सची ट्रेनिंग सुरू