रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. भारत या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत पुढे आहे. दोन्ही संघातील तिसरा एकदिवसीय सामना रांची येथे होणार आहे. या सामन्यासाठी काही ऑस्ट्रेलियाचे फॅन्स रांचीमध्ये दाखल झाले आहेत. फॅन्सनी त्या मंदिरालाही भेट दिली ज्या मंदिरातील आशीर्वादाने धोनी मोठा झाला आहे.
महेंद्र सिंह धोनी मोठ्या मालिकेपूर्वी रांचीपासून ६० किलोमीटर दूर असलेल्या देवडी मातेच्या मंदिरात दर्शन घेतो. ऑस्ट्रेलियाच्या फॅन्सनी देखील याच मंदिराला भेट दिली आहे. या मंदिराची चर्चा नेहमीच देश-विदेशात होत असते.
ऑस्ट्रेलियाच्या फॅन्सला त्या मंदिराविषयी माहिती जाणून घ्यायची होती. म्हणून त्यांनी या मंदिराला भेट दिली. याच्याविषयी माहिती घेण्यासाठी ते आसपासच्या लोकांना प्रश्न विचारत होते. धोनीने २०११ साली विश्वचषक जिंकल्यानंतर याच मंदिरात त्याने केश अर्पण केले होते.