मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने भारतीय फलंदाजांना इशारा दिला आहे. यात त्याने, ऑस्ट्रेलियाचा संघ निश्चितपणे भारताविरुध्द अखुड टप्प्याच्या चेंडूची रणनितीवर भर देईल, असे सांगितलं आहे.
काय म्हणाला हेझलवूड
मला वाटतं की प्रसंगानुसार आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर एक रणनिती म्हणून केला जाईल. हा खेळाचा एक भाग आहे. ऑस्ट्रेलियात इतर देशाच्या तुलनेत धावपट्टीवर गती आणि उसळी घेणारे चेंडू असतात. तसेच खेळपट्टी वेळोवेळी सपाट पण असू शकते. यामुळे जर आम्हाला खोल टप्प्याच्या चेंडूंवर गडी बाद करता आले नाहीत तर आम्ही बाऊंसर आणि डाव्या बाजूच्या क्षेत्ररक्षणाबरोबर वेगवेगळ्या वेळेवर फलंदाजांना आव्हान देऊ. हा नेहमीच आमच्या रणनीतीचा भाग राहिला आहे, असे हेझलवूडने सांगितलं.
विराटबाबत काय म्हणाला हेझलवूड
एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिनही सामन्यांत मी कोहलीला बाद केले होते. त्यामुळे त्याच्यासमोर जेव्हा कसोटी सामन्यात मी उतरेन तेव्हा माझा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला असणार आहे. त्याचबरोबर विराट फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्याविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करून त्याला लवकर बाद करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे हेझलवूडने सांगितलं.
दरम्यान, उभय संघातील पहिला सामना १७ डिसेंबर पासून अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र गुलाबी चेंडूवर खेळला जाणार आहे.
हेही वाचा - दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''टीम इंडिया सर्व सामने हरणार''
हेही वाचा - भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी 'हा' गोलंदाज संघात होणार दाखल