मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे शतक झळकावत मैदानात तळ ठोकून आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ८२ धावांची आघाडी मिळाली आहे. अशात ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसरी कसोटी खेळण्याची शक्यता कमी आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, डेव्हिड वॉर्नर १०० टक्के फिट झालेला नाही.
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी वॉर्नर नेटमध्ये सराव करताना पाहायला मिळाला. पण त्याला धावताना त्रास होत आहे. आम्हाला आशा आहे की, वॉर्नर लवकरच वापसी करेल, असे देखील लँगर यांनी सांगितले.
दरम्यान, वॉर्नरच्या अनुपस्थितीत जो बर्न याला संघात संधी मिळाली आहे. उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसरा सामना मेलबर्नच्या एमसीजी मैदानात खेळला जात आहे. या सामन्यावर भारतीय संघाने पकड निर्माण केली आहे.
हेही वाचा - धोनी नाम ही काफी है! दशकातील सर्वोत्तम आयसीसी एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व माहीकडे
हेही वाचा - AUS VS IND : अजिंक्य रहाणेच्या खेळीचे स्टार्कने केले कौतूक, म्हणाला...