लंडन - ऑस्ट्रेलिया संघाचा इंग्लंड दौरा निश्चित झाला आहे. उभय संघात ४ सप्टेंबरपासून ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी याची माहिती दिली.
दोन्ही संघात टी-२० सामने ४, ६ आणि ८ सप्टेंबरला खेळले जातील. हे सर्व सामने साऊथम्प्टनमधील एजेस बाऊल येथे होणार आहेत, तर ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जातील. ११, १३ आणि १५ रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत.
२४ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियाचा संघ ग्रेट ब्रिटनमध्ये दाखल होईल, अशी माहिती ईसीबीने दिली आहे. हा संघ प्रथम डर्बीशायर येथे जाईल. त्यानंतर साऊथम्प्टनला पोहोचेल. टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ ५० षटकांचा एक आणि तीन टी-२० सराव सामनेही खेळतील.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, कर्मचारी आणि प्रशासकांचे आम्ही आभारी आहोत, त्यांनी या दौऱ्याला सहमती दर्शवली आहे.''
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, "कठीण परिस्थितीत क्रिकेट चालू ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. विश्वचषक, कसोटी मालिका, भारत आणि दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या मालिका आपल्यासमोर आहेत. त्याखेरीज अॅशेस मालिकाही आहे. आम्ही पुन्हा मैदानात परत येण्याची वाट पाहू शकत नाही."