सिडनी - दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च क्रिकेट सन्मानाने गौरवण्यात आले आहे. स्मिथला अॅलन बॉर्डर पदक देण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली. २०२०-२१मध्ये स्मिथची कामगिरी चांगली झाली होती. सध्या तो फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानी विराजमान आहे.
हेही वाचा - भारतातील सहा ठिकाणी रंगणार विजय हजारे करंडक स्पर्धा
स्मिथला याआधी दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. २०१९-२०मध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला हा सन्मान मिळाला होता. नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्मिथची कामगिरी शानदार झाली होती. सिडनी कसोटी सामन्यात स्मिथने १३१ धावांची शानदार खेळी केली.
स्मिथ म्हणाला, ''मी उत्साही आहे. परंतु या पुरस्काराची मला कल्पनाही नव्हती. मला वाटले की, मार्नस लाबुशेन किंवा पॅट कमिन्स यांना हा पुरस्कार मिळेल. या हंगामात मला कसोटीत चांगली कामगिरी करता आली नाही.'' अॅरॉन फिंच आणि लेगस्पिनर अॅडम झम्पा यांना मागे टाकत स्मिथला वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे. तर, महिलांमध्ये बेथ मुनीने प्रथमच बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला आहे. मतदान प्रक्रियेच्या आधारे हे पुरस्कार दिले गेले.
बॉर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. सलग दुसर्या वेळेस टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर नमवले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतीच्या विळख्यात सापडला होता. शिवाय, संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मात देत इतिहास घडवला.
इतर पुरस्कार (२०२०-२१) -
- सर्वोत्तम कसोटीपटू - पॅट कमिन्स
- ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम - जॉनी मुलाघ, मर्व्ह, ह्युजेस, लिसा स्थळेकर
- सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपटू (पुरुष) - एश्टन अगर
- सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपटू (महिला) - बेथ मुनी
- सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (पुरुष) - स्टीव्ह स्मिथ
- सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (महिला) - राचेल हायनेस
- सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू (महिला) - इलीस विलानी
- सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू (पुरुष) - शॉन मार्श
- ब्रेटी विल्सन युवा क्रिकेटपटू - हाना डार्लिंग्टन
- ब्रॅडमन युवा क्रिकेटपटू - विल सदरलँड
- कम्म्युनिटी इम्पॅक्ट पुरस्कार - जोशुआ लालोर