मुंबई - ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंगसाठी कुप्रसिद्ध आहेत. पण, अलिकडच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली याच्यासह इतर खेळाडूंसोबत पंगा घेताना दिसत नाही. या गोष्टीचे कारण ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडू सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने एका क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितले की, 'सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया किंवा अन्य कोणत्याही देशाचे खेळाडू कोहली कंपनीशी पंगा घेताना दिसत नाही. या गोष्टीचे कारण आहे आयपीएल. जर कोहलीशी पंगा घेतला तर आयपीएलमध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही किंवा जास्त मानधन मिळणार नाही, याची धास्ती खेळाडूंना नक्कीच वाटत आहे. त्यामुळे ते कोहली कंपनीशी पंगा घेताना दिसत नाही.'
काही खेळाडूंनी तर आम्हाला आयपीएल खेळायचे आहे. कोहलीच्या संघात राहून आम्हाला चांगले मानधन कमवायचे आहे, असे थेट सांगितल्याचेही क्लार्क म्हणाला.
पुढे बोलताना क्लार्क म्हणाला, 'आयपीएलमुळे भारतातील क्रिकेट मंडळ हे आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कोहलीशी पंगा म्हणजे भारताशी पंगा, असे काही खेळाडूंना वाटते. त्यामुळे कोणत्याही देशाचे खेळाडू कोहली कंपनीशी पंगा घेताना दिसत नाहीत.'
दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामावार कोरोनाचे सावट आहे. या स्पर्धेला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. पण सद्य परिस्थिती पाहता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होईल, असे दिसत नाही.
मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्या काळात आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यासाठी आशिया चषक ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी बीसीसीआयला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
हेही वाचा - Video : सचिन आउट आहे की नाही, तुम्हीच सांगा; वॉर्नचा सवाल
हेही वाचा - हाफिज आणि मलिक यांनी 'इज्जती'ने क्रिकेट सोडावं - पाक माजी कर्णधार