अॅडलेड - ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजामध्ये केली जाते. त्याने इंग्लंड विरुध्दच्या अॅशेस मालिकेत ७०० धावा ठोकत ते सिध्दही केलं आहे. असा धडाकेबाज फलंदाज पाकिस्तान विरुध्द मात्र, अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. पाक विरुध्दच्या पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला तरीही ऑस्ट्रेलियाने हा सामना १ डाव ५ धावांनी जिंकला. आकडेवारी पाहिल्यास पाकचा फिरकीपटू यासीर शाह स्मिथसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया संघाने डाव राखून जिंकला. विजयी सामन्यात स्टिव्ह स्मिथ मात्र, यासीर शाहच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचित झाला. स्मिथने या सामन्यात १० चेंडूचा सामना करत अवघ्या ४ धावा केल्या. स्मिथचा त्रिफाळा उडवल्यानंतर शाहने ७ नंबर आकड्याचा इशारा केला. याचा अर्थ त्याने स्मिथला ७ वेळा बाद केला असल्याचे सांगितले.
आजघडीपर्यंत स्मिथ आणि शाह हे दोघे १० वेळा समोरासमोर आले आहेत. यात शाहने स्मिथला ७ वेळा बाद केले आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही स्मिथला ७ वेळा बाद केले आहे. स्मिथ आणि ब्रॉड २६ वेळा समोरासमोर आले होते.
पाक विरुध्दच्या सामन्यानंतर स्मिथने सांगितलं की, 'शाहचा इशारा मला पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्सहित करतं. मी दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.' दरम्यान, उभय संघात दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर २९ नोव्हेंबर पासून रंगणार आहे.
हेही वाचा - कोलकात्यात अडकलायं बांगलादेशचा सलामीवीर, 'या' कारणानं झाला २१,६०० रुपयांचा दंड
हेही वाचा - हॅमिल्टन कसोटी : उभय संघाला दुखापतीचे ग्रहण; बोल्ट, ग्रँडहोम नंतर इंग्लंडचा 'हा' खेळाडू जायंबदी