अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने दिवस-रात्र कसोटी सामन्यात खेळताना ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्रिशतक ठोकले. या कामगिरीसह तो गुलाबी चेंडूवर त्रिशतकी खेळी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी पाकिस्तानच्या अझहर अलीने वेस्ट इंडीज विरुध्द त्रिशतकी कामगिरी केली आहे.
अझहर अलीने १३ ऑक्टोबर २०१६ मध्ये वेस्ट इंडीज विरुध्द ३०२ धावा केल्या होत्या. अलीचा हा विक्रम वॉर्नरने नाबाद त्रिशतकी खेळी करून मोडीत काढला. त्याने या सामन्यात नाबाद ३३५ धावा केल्या. विशेष म्हणजे, वॉर्नरची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विक्रमासह वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतकी खेळी करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा ३३४ धावांचा विक्रमही मोडीत काढला.
त्रिशतकी खेळीनंतर वॉर्नरने रचले अनोखे विक्रम -
- वॉर्नर अॅडलेड मैदानावर सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांनी या मैदानावर २९९ धावा केल्या होत्या. वॉर्नरने या मैदानावर नाबाद ३३५ धावा केल्या आहेत.
- दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक ठोकणारा वॉर्नर पहिला फलंदाज ठरला.
- वॉर्नर मायदेशात त्रिशतकी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला.
अॅडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात दिवस-रात्र कसोटी सामना रंगला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर (नाबाद ३३५) आणि मार्कस लाबुशेनच्या (१६२) शतकी खेळींच्या जोरावर आपला पहिला डाव ३ बाद ५८९ धावांवर घोषित केला आहे.
हेही वाचा - तेरा ध्यान किधर है..! पाकच्या खेळाडूचे अजब क्षेत्ररक्षण...व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल
हेही वाचा - रोहित शर्मा नव्हे तर 'सुपर' रोहित शर्मा...'हिटमॅन'चा भाव वधारला
हेही वाचा - Aus vs Pak : स्मिथने मोडला ७३ वर्ष जुना विक्रम; सचिन, विराटला टाकले मागे