दुबई - आयपीएलनंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. उभय संघाच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. आता विराट दोन नाही तर तीन सामन्यांतून बाहेर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे आहे कारण...
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचे दोन कसोटी सामने न खेळताच मायदेशी परतण्याची शक्यता होती. विराटची पत्नी अनुष्का गर्भवती असून जानेवारीत बाळ होणार असल्याचे विरुष्का जोडीने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे पहिल्या बाळाच्या जन्मासाठी विराट अनुष्कासोबतच राहणार आहे. अनुष्का सध्या दुबईत आहे, परंतु ती ऑस्ट्रेलियात जाणार नाही.
काय आहे बीसीसीआयचे म्हणणे..
जानेवारी २०२१ मध्ये विराट-अनुष्का आई बाबा बनणार आहेत. कुटुंब हे पहिलं प्राधान्य, हेच बीसीसीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे जर कर्णधार कोहलीला पितृत्व रजा घ्यावयाची असेल, तर तो केवळ पहिल्या एक कसोटीसाठीच उपलब्ध असेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. विराट कोहलीने जर तीन सामन्यात माघार घेतली. तर संघाचे नेतृत्व मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना १७-२१ डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. २६ ते ३० डिसेंबर या दरम्यान, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा सामना होईल. तिसरा सामना सिडनी येथे ७-११ जानेवारी २०२१ ला खेळला जाणार आहेत. तर ब्रिस्बेनच्या मैदानात १५-१९ जानेवारी २०२१ दरम्यान होईल.
हेही वाचा - IPL २०२० : अंतिम सामन्याआधी सचिनचा मुंबई इंडियन्ससाठी खास संदेश
हेही वाचा - IND VS AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार; पण त्यासाठी करावे लागणार 'हे' काम