मुंबई - आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा या आधीच करण्यात आली आहे. आता बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यासाठी, खेळाडूंना, पत्नी आणि मुलांना सोबत नेण्याची परवानगी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि क्वारंटाइन ठेवण्याच्या नियमांमुळे खेळाडूंना पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळणार की नाही, याबाबत शंका होती. पण आता बीसीसीआयनेच खेळाडूंना पत्नी आणि मुलांना ऑस्ट्रेलिया दौर्यावर नेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबियांसह जाता येणार आहे.
दरम्यान, काही भारतीय खेळाडूंनी आम्हाला कुटुंबातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. त्यांच्यातील काही खेळाडू आपल्या पत्नीला यूएई येथे सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत सोबत घेऊन गेले नव्हते. आम्ही अनौपचारिकरित्या खेळाडूंना सांगितले की ते त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकतात. त्यांच्या कुटूंबाच्या पासपोर्टचा तपशील घेण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
खेळाडूंना व्हावे लागेल क्वारंटाइन...
भारतीय संघ आयपीएलनंतर दुबईहून चार्टर विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर खेळाडूंना सिडनीमध्ये १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यांना सात दिवसानंतर सरावाला सुरूवात करण्याची मुभा दिली जाणार आहे.
हेही वाचा - आयपीएल 'कॅप्स' : फलंदाजांत के. एल. राहुल तर गोलंदाजीत रबाडा अव्वल
हेही वाचा - IPL 2020 : आरसीबीविरुद्धच्या सामन्याआधीच हैदराबादला जबर झटका, 'हा' अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर