लीड्स - अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा पहिला डाव जोश हॅझलवूडच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ६७ धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मार्नस लॅबूशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ५६ षटकात ६ बाद १७० धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघाकडे एकूण २८३ धावांची आघाडी झाली आहे.
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७९ धावांवर रोखले. आर्चरने ४५ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ६ गडी तंबूत धाडले. मात्र, याचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांना उठवता आला नाही. कर्णधार जो रुट सलग दुसऱ्यांदा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे उपाहारानंतर काही मिनिटांतच इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हॅझलवूडने ३० धावांमधये ५ बळी घेतले. तर त्याला पॅट कमिन्स (३/२३) आणि जेम्स पॅटिन्सन (२/९) यांची साथ मिळाली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱया डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशजनक झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर खातेही न खोलता स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मार्कस हॅरिस (१९), उस्मान ख्वाजा (२३) हे माघारी परतले.
तेव्हा मार्नस लॅबूशेन आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने चौथ्या गड्यासाठी ४५ धावांची भर घातली. लॅबूशेनने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला खडतर स्थितीतून बाहेर काढले.
संक्षिप्त धावफलक
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) - ५२.१ षटकांत सर्व बाद १७९ ( डेव्हिड वार्नर (६१), मार्नस लॅबूशेन (७४), जोफ्रा आर्चर ६/४५)
- इंग्लंड (पहिला डाव) - २७.५ षटकांत सर्व बाद ६७ (जो डेन्ले १२, जोश हॅझलवूड ५/३०)
- ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) - ५६ षटकांत ६ बाद १७० (मार्नस लॅबूशेन नाबाद खेळत आहे ५२, मॅथ्यू वेड ३३, ट्रेव्हिस हेड २५, बेन स्टोक्स २/३२, स्टुअर्ट ब्रॉड २/३४)