अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील उर्वरित तिनही सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत. अहमदाबादसह गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, गुजरात क्रिकेट असोसिएशनने तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची टी-२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी होती. पण अहमदाबादसह गुजरात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनने तडकाफडकी निर्णय घेत उर्वरित सामने विनाप्रेक्षक खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
उभय संघातील मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघाने दुसरा सामना ७ गडी राखून जिंकत मालिकेत बरोबरी साधली.
भारताने दुसरा सामना असा जिंकला
इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने ३ गड्याच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले. या सामन्यात इशान किशनने सलामीला येत ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारासह ५६ धावांची दमदार खेळी केली. यानंतर विराटने मोर्चा सांभाळत नाबाद ७३ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उभय संघातील तिसरा सामना उद्या मंगळवारी ( ता. १६) होणार आहे.
प्रेक्षकांना मिळणार तिकिटाचे पैसे परत..
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नाथवानी यांनी आज जाहीर केले की नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पुढील सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. पुढील सामन्यांची तिकीटे ज्यांनी खरेदी केली आहेत, त्यांना तिकिटाचे पैसे परत देण्यात येणार असल्याची माहितीही नाथवानी यांनी दिली. तसेच, ज्यांना कॉम्प्लिमेंटरी पास मिळाले होते, त्यांनाही या सामन्यांसाठी मैदानावर येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - IND VS ENG : टी-२० डेब्यूनंतर सूर्यकुमार ट्विट करून म्हणाला...
हेही वाचा - ४९ चेंडूत नाबाद ७३ रन्स : विराट म्हणाला, 'या' खेळाडूशी चर्चा केल्याने सूर गवसला