लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने पाच महान क्रिकेटपटूंची निवड केली आहे. कुकच्या या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्थान मिळाले आहे. कुकने विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या जवळ विराट पोहोचला असल्याचे सांगितले. लारा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटच्या एका डावात 400 धावा केल्या आहेत. लाराने 131 कसोटी सामन्यांत 11953 तर 299 एकदिवसीय सामन्यात 10505 धावा केल्या आहेत.
कुक म्हणाला, "2004 मध्ये वेस्ट इंडिज दौर्यावर गेलेल्या एमसीसी संघाचा मी भाग होतो़. सायमन जोन्स, मॅथ्यू हॉगार्ड आणि मीन पटेल यांच्यासारखे आक्रमक गोलंदाज आमच्या ताफ्यात होते. त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात लाराने दुपारच्या आणि चहाच्या वेळेदरम्यान शतक झळकावले होते, त्यावरून मला जाणवले की तो किती महान फलंदाज आहे. त्याच्याकडे बुद्धिमत्ता होती.''
कोहली व्यतिरिक्त कुकने रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि कुमार संगकारा यांनाही महान फलंदाजांमध्ये समावेश केला आहे. इंग्लंडकडून 59 कसोटी सामन्यांचा कर्णधार असलेला कुक म्हणाला, "जेव्हा मी इंग्लंडकडून खेळत होतो तेव्हा लाराच्या जवळचा पाँटिंग, कॅलिस आणि संगकारा होता. आता या गटात विराट कोहलीचे नाव घ्यावे लागेल. तो तिन्ही फॉर्मेटमध्ये निर्भीडपणे धावा करत आहे.'' भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरला मात्र कुकच्या यादीत स्थानन मिळाले नाही.