नवी दिल्ली - बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघामध्येही तणाव वाढला आहे. ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कनिका थांबली होती त्याच हॉटेलमध्ये आफ्रिकेचा संघही थांबला होता. कनिका कपूर १५ मार्च रोजी लंडनहून परतली आणि लखनऊमधील या नामांकित हॉटेलमध्ये थांबली होती.
हेही वाचा - भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निलंबन, महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप
उत्तर प्रदेश आरोग्य विभाग कनिकाच्या संपर्कात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आलेल्या लोकांचा पाठपुरावा करत आहे. 'बेबी डॉल' गाण्याची सुप्रसिद्ध गायिका असलेल्या कनिकाने सोशल मीडियावरून कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर, तिला लखनऊ येथील केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले. भारतात येण्यापूर्वी ती लंडन येथे काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही सध्या तपासणी करण्यात येत आहे.
भाजप नेते दुष्यत सिंह यांचाही कनिका कपूरशी संपर्क आला होता. त्याच्या २ दिवसानंतर म्हणजेच १८ मार्चला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या खासदारांना अल्पोपहारासाठी आमंत्रण दिले होते. कार्यक्रमात ९६ खासदारांनी उपस्थिती लावली होती.