लखनऊ - आपल्या गोलंदाजांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने भारताला धूळ चारली. मंगळवारी एकाना क्रिकेट स्टेडियम-बी मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्यांनी भारताचा तीन गडी राखून पराभव केला.
हेही वाचा - शास्त्री गुरूजींनी सांगितलं धोनीच्या 'निवृत्तीचं' रहस्य, म्हणाले....
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय अफगाणिस्तानने सत्कारणी लावला. गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघ ४९ षटकांत १५२ धावांवर सर्वबाद झाला. यजमान संघाकडून कर्णधार शुभांग हेगडेने ४६, विक्रांत भदोरिया ३९ आणि दिव्यांश सक्सेनाने २४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून आबिद मोहम्मदीने चार, अब्दुल रहमानने तीन, अबिदुल्ला तनिवालने दोन आणि शफीउल्ला गफारीने एक गडी बाद केला.
भारताचे हे आव्हान अफगाणिस्तानने ४६.२ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून इम्रान मीरने सर्वाधिक 34, मोहम्मद इशाकने ३२, अब्दुल रहमानने नाबाद २६ आणि रहमान उल्लाहने २१ धावांचे योगदान दिले. भारताकडून कार्तिक त्यागीने तीन, कर्णधार शुभांग हेगडेने दोन आणि ऋषभ बन्सलने एक गडी बाद केला.
या पराभवानंतरही भारतीय संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. भारताने पहिला सामना नऊ विकेटने तर दुसरा सामना दोन गडी राखून जिंकला. दोन्ही संघांमधील चौथा एकदिवसीय सामना खेळवला गुरुवारी जाईल.