नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २०२० ला बीसीसीआयने विरोध दर्शवला आहे. यामुळे आशिया चषक पाकिस्तामध्ये होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने आशिया चषक संदर्भातील निर्णय आशियाई क्रिकेट परिषद करेल, असे सांगितले.
भारतीय संघाचा आशिया चषक स्पर्धेतील सहभागाबाबत बीसीसीआयने कोणतेही घोषणा केलेली नाही. कारण ही स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर अजूनही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका अजूनही खेळवल्या जात नाहीत. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसायचे बंद करावे, त्यानंतरच पाकसोबत क्रिकेट खेळले जाईल हा पावित्रा भारताने अद्याप कायम ठेवला आहे.
दहशतवाद या कारणाने पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये खेळण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे, त्याचबरोबर भारताचे खेळाडू पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास तयार नाहीत. बीसीसीआयने त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानबरोबरची मालिका खेळायला परवानगी दिलेली नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पीसीबी जून २०२० पर्यंत भारताच्या निर्णयाची वाट पाहणार आहे. भारताने जर खेळायला होकार दिला तर काहीच प्रश्न नाही, पण भारताने नकार दिला तर या स्पर्धेबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. भारताने नकार दिला तर या विषयी आशियाई क्रिकेट परिषद जे निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य करावे लागेल.'
दरम्यान, आगामी आशिया चषक स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवली जाणार असून ऑस्ट्रेलियात सप्टेंबर २०२० मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरडंकापूर्वी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारताने जर पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला तर ही स्पर्धा सुरक्षेच्या कारणास्तव संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - भारताचा आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय, प्रियाची पदार्पणातच दणकेबाज खेळी
हेही वाचा - धडाकेबाज..! महिलांमध्ये असा विक्रम करणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू