मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वकरंडकासाठी संभाव्य विजेते जाहिर केले आहेत. एबीच्या मते, आशियातील बलाढ्य संघ भारत आणि पाकिस्तान विश्वकरंडक विजयाचे प्रबळ दावेदार आहेत.
एबी म्हणाला, कोणत्याही एका संघाचे नाव जाहिर करणे अवघड आहे. परंतु, माझ्यामते भारत आणि पाकिस्तानला विश्वकरंडक जिंकण्याची चांगली संधी आहे. भारत आणि पाकिस्तान संघ गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहेत. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी तर, भारताने आशिया कप जिंकला आहे. इंग्लंडदेखील यजमान असल्याने तेही विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलियाही आणि दक्षिण आफ्रिका संघांनाही विश्वकरंडक जिंकण्यास वाव आहे.
विंडीज संघाने सध्या केलेल्या चांगल्या कामगिरीबाबत आणि त्यांच्या विश्वकरंडकातील संधीबाबत बोलताना एबी म्हणाला, त्यांनीही क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे विजेतेपदासाठी कोणत्याही एका किंवा दोन संघाना आपण संभाव्य विजेते म्हणू शकत नाही.
इंग्लंड येथे मे महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आणि तज्ञांनी विश्वकरंडकासाठी संभाव्य विजेत्यांची नावे जाहिर केली आहेत.