लंडन - दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्स पहिल्यांदा मला भेटला तेव्हा त्याने मला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मानले होते, असे जोस बटलरने सांगितले आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. या संघाच्या सोशल मीडियावर पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान बटलरने हा खुलासा केला.
बटलर म्हणाला, "मी लहान असल्यापासून डिव्हिलियर्स हा माझा आदर्श आहे. मला त्याचा खेळ आवडतो. तो खरोखरच आश्चर्यकारक आहे. आयपीएलच्या वेळी जेव्हा मी मुंबई इंडियन्सकडून खेळायचो, तेव्हा डिव्हिलियर्सची थोडीशी ओळख झाली. सामना संपल्यानंतर तो माझ्याबरोबर बिअर पिणार होता.''
२०१९मध्ये वर्ल्डकप जिंकणार्या इंग्लंड संघाचा सदस्य असलेला बटलर पुढे म्हणाला, "मी खूप उत्साही होतो. त्याच्याबरोबर बिअर पिण्यास मजा आली. आम्ही जवळपास २० मिनिटे एकमेकांशी बोललो आणि मला ते खूप आवडले. तो एक आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आहे. २० मिनिटांच्या या संभाषणात डिव्हिलियर्सने अचानक मला विचारले की तू न्यूझीलंडच्या कोणत्या भागातून आला आहेस? त्याच्या या प्रश्नाने मी हादरलो.''
बटलरचा जन्म टॉन्टनमध्ये झाला असून त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत ४१ कसोटी, १४२ एकदिवसीय आणि ६९ टी-२० सामने खेळले आहेत.