कोलंबो - विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघाचा गोलंदाज लियाम प्लंकेट आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांच्यासह एकूण ९३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) भाग घेणार आहेत. एलपीएलचा पहिला हंगाम २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज आणि वेस्ट इंडीजचा सलामीवीर ड्वेन स्मिथचादेखील या लीगच्या परदेशी खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.
दुबईतील स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग कंपनीला एलपीएलचे पाच वर्षांसाठी सर्व हक्क देण्यात आले आहेत. या टी-२० लीगमध्ये पाच संघ असतील आणि चार आंतरराष्ट्रीय मैदानावर २३ सामने खेळवण्यात येतील. या लीगमध्ये भाग घेणार्या पाच संघांची नावे कोलंबो, केन्डी, गाले, डम्बुला आणि जाफना या शहरांच्या नावावरून असणार आहेत. लीगचा अंतिम सामना २० सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
कोरोनामुळे स्थगित झालेले क्रिकेट हळूहळू सुरू होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान, बीसीसीआयनेही यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसीच्या बैठकीत टी-२० वर्ल्डकप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) २०२०चेही वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा १८ ऑगस्टपासून सुरू होईल, तर अंतिम सामना १० सप्टेंबरला खेळला जाईल. लीगचे सर्व ३३ सामने त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे दोन स्टेडियममध्ये खेळले जातील.