लंडन - अॅशेस २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा 'तारणहार' फलंदाज स्टीव्ह स्मिथने धावांचा पाऊस पाडला. त्याने या मालिकेत ११०.५७ च्या भन्नाट सरासरीने ७ डावात ७७४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथवर १२ महिन्यांच्या बंदीची कारवाई झाली होती. त्यानंतर अॅशेस मालिकेतून स्मिथने पुनरागमन केले आणि आपली गुणवत्ता दाखवत स्पर्धेत ठसा उमटवला. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
अॅशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवले. ऑस्ट्रेलियाचे संघातील इतर कोणतेही फलंदाज इंग्लंडच्या आक्रमणासमोर टिकू शकले नाहीत, अशा स्थितीत स्मिथने धैर्याने खेळ करत संघाला अनेकवेळा अडचणीतून बाहेर काढले. यामुळे इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने स्मिथला बाद करणे माझ्यासाठी कठीण असल्याचे सांगितले. स्मिथने अॅशेसमध्ये आपली विकेट सहजासहजी फेकली नाही. मात्र, अशा चिवट फलंदाजाला कसोटीत शुन्यावर बाद करण्याचा पराक्रम आतापर्यंत ४ गोलंदाजांनी केला आहे. वाचा कोण आहेत ते गोलंदाज -
केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) -
२०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याने शुन्यावर बाद केले होते. महत्वाचे म्हणजे, स्टीव्ह स्मिथ हा केशव महाराज याचा पहिला कसोटी बळी ठरला.
जुल्फिकार बाबर (पाकिस्तान) -
२०१४ मध्ये पाकिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत स्टीव्ह स्मिथला धावा करण्यासाठी प्रखर संघर्ष करावा लागला. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने पहिल्या डावात ५७० धावा केल्या. याच्या प्रत्त्युत्तरात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. ऑस्ट्रेलियाचे अवघ्या ९७ धावांवर ४ गडी बाद झाले होते. कर्णधार मायकल क्लार्क मैदानात होता. तेव्हा स्टीव्ह स्मिथवर क्लार्कसोबत मोठी भागीदारी करुन संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी होती. मात्र, स्मिथ पाकचा फिरकीपटू जुल्फिकार बाबरच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला.
डेल स्टेन ( दक्षिण आफ्रिका) -
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर भारी पडला आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन. स्टेनने या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर बाऊंसरचा मारा केला. या कसोटीत स्टेनच्या गोलंदाजीवर स्मिथ शुन्यावर बाद झाला होता.
क्रिस ट्रेमलेट (इंग्लंड) -
क्रिस ट्रेमलेट याने स्टीव्ह स्मिथला कसोटी प्रकारात पहिल्यांदा बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने २०१३ साली हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया संघाने २०१३ साली अॅशेस मालिका ५-० ने जिंकली. या मालिकेत ट्रेमलेटने स्मिथला शुन्यावर बाद केले होते.