मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सुरूवातीचे काही सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
जोफ्रा भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला असून तो उपचारासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. दरम्यान, अद्याप आर्चर आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याबाबत राजस्थानने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण एप्रिल महिन्यात आर्चरची दुखापत पाहून निर्णय घेतला जाणार आहे. यादरम्यान, राजस्थानचा संघ आर्चरच्या जागेवर दुसऱ्या गोलंदाजाला आपल्या संघात सामिल करू शकतो. सद्यघडीला ३ गोलंदाज असे आहेत जे ऑर्चरची जागा घेऊ शकतात. वाचा कोण आहेत ते गोलंदाज...
ब्लेयर टिकनर -
न्यूझीलंडचा गोलंदाज ब्लेयर टिकनर जोफ्रा आर्चरचा रिप्लेसमेंट ठरू शकतो. सुपर स्मॅश स्पर्धेत टिकनर याने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केलं आहे. त्याने ११ सामन्यात १७ गडी बाद केले आहेत. राजस्थानच्या संघाला आपल्या साखळी सामन्यातील पाच सामने वानखेडे स्टेडियममध्ये खेळावयाची आहेत. या मैदानावर टिकनर प्रभावी ठरू शकतो.
बिली स्टॅकलेक -
बिली स्टॅकलेक हा ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज आहे. तो सातत्याने १४५ किलोमीटर वेगाने मारा करू शकतो. आर्चरच्या जागेवर तो चांगला रिप्लेसमेंट ठरू शकतो. स्टॅकलेकला सनरायझर्स हैदराबादकडून केवळ सहा सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. आता हैदराबादने त्याला रिलिज केलं आहे.
जेसन बेहरनडॉर्फ -
राजस्थान संघाची नजर जेसन बेहरनडॉर्फवर देखील असेल. कारण नवा चेंडू हाताळण्यास तो वाकबदार आहे. याशिवाय त्याला भारतात खेळण्याचा अनुभव देखील आहे. बेहरनडॉर्फने आतापर्यंत ७९ टी-२० सामने खेळली आहेत. यात त्याच्या नावे ९० विकेट्स आहेत. बिग बॅशमध्ये त्याने १६ सामन्यात ७.०३ च्या इकोनॉमीने १६ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - सचिनच्या नेतृत्वात इंडिया लेजंड्सने जिंकली 'रोड सेफ्टी सीरीज'
हेही वाचा - विराट सेनेचा कारनामा: टी-२०त २ वर्ष अजिंक्य, सलग ६ मालिका जिंकण्याचा केला पराक्रम