मुंबई - आयपीएलच्या १३ हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. रैनाच्या या निर्णयामुळे सीएसके संघासह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता रैनाची जागा कोण घेणार? यावर चर्चा रंगली आहे. सीएसके संघ रैनाच्या जागेवर तीन खेळाडूंचा विचार नक्कीच करेल, वाचा कोण आहेत ते खेळाडू...
हनुमा विहारी -
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे खेळाडूंचा विदेशी कोटा शिल्लक नाही. यामुळे रैनाच्या ठिकाणी हनुमा विहारी याचा विचार होऊ शकतो. आयपीएलच्या १२ हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून हनुमा विहारी खेळला. या हंगामात त्याने फिनिशरच्या रुपात फलंदाजी केली. महत्वाचे म्हणजे २६ वर्षीय हनुमा विहारी ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. यामुळे रैनाच्या जागेसाठी हनुमा विहारीचा विचार धोनीचा संघ करू शकतो.
युसूफ पठाण -
आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायझींनी युसूफ पठाणवर बोली लावली नव्हती. युसूफ आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघाकडून खेळला आहे. महत्वाचे म्हणजे त्या तिनही संघानी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. युसूफ जलद धावा काढण्यासोबत गोलंदाजीही करतो. त्याच्याकडे आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. त्याने १४२ सामने खेळली आहेत. हे सर्व पाहता रैनाच्या जागेवर युसूफचा विचार केला जाऊ शकतो.
रोहन कदम -
कर्नाटकचा डावखुरा फलंदाज रोहन कदम याच्यावरही फ्रेंचायझींनी बोली लावली नाही. पण त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईविरुद्ध खेळताना ७१ धावांची ताबडतोड खेळी केली होती. त्याच्या या खेळीची चर्चा झाली. रोहन मधल्या फळीत फलंदाजी करताना वेगाने धावा जमवण्यासाठी ओळखला जातो. हे सर्व पाहता रैनाच्या जागेवर रोहनही दावेदार ठरू शकतो.