दुबई - आयसीसीने २०२१ मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधी दरम्यान खेळली जाणार असून या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यासह ४ संघाला पात्रता फेरी खेळून विश्व करंडकाचे तिकीट मिळवावे लागणार आहे.
या संघाना थेट एन्ट्री -
गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांना विश्वकरंडकात थेट एन्ट्री मिळाली आहे. तर भारत पाकिस्तान यांना पात्रता फेरी खेळावी लागेल. महिला चॅम्पियनशीप आणि जूलै महिन्यात श्रीलंकेत होणारी विश्वकरंडक पात्रता फेरीनंतर अन्य ४ संघ निश्चित होतील.
सहा स्टेडियममध्ये रंगणार विश्वकरंडकाचा थरार...
न्यूझीलंडच्या सहा विविध स्टेडियमवर ३१ सामन्यांची ही स्पर्धा रंगणार आहे. ऑकलंड, हॅमिल्टन, टौरांगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डुनेडीन येथे महिला विश्वकरंडकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ७ मार्चला ख्राईस्टचर्च येथे होईल. उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे ३ व ४ मार्चला टौरांगा आणि हॅमिल्टन येथे खेळवण्यात येतील.
राऊंड रॉबिन पद्धतीने होणार स्पर्धा -
न्यूझीलंड विश्वकरंडकात सहभागी होणारे ८ संघ राऊंड रॉबिन पद्धतीने म्हणजे प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. हे सामने झाल्यानंतर अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद -
ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-२० विश्वकरंडकात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अ गटात अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर विश्वकरंडकाच्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस असायला हवा, अशी मागणी जोर धरु लागली. यावर आयसीसीने निर्णय घेत, विश्वकरंडकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.
विश्वकरंडकाच्या बक्षीसात वाढ -
आयसीसीने विश्वकरंडकाच्या बक्षीस रकमेत वाढ केली असून न्यूझीलंडमधील एकदिवसीय विश्वकरंडक विजेत्याला ५.५ मिलियन डॉलर्स इतकी बक्षीसाची रकम मिळणार आहे. दरम्यान, याआधी म्हणजे, २०१७ मध्ये बक्षीसाची रक्कम ३.१ मिलियन डॉलर्स इतकी होती.