दुबई - ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून सहा संघांनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. ओमान हा या मुख्य फेरीत प्रवेश मिळवणारा अंतिम संघ ठरला असून आता टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम १६ संघ जवळपास निश्चित झाले आहेत.
आयसीसी क्रमवारीतील अव्वल ८ संघ मुख्य फेरीसाठी थेट पात्र ठरले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या या स्पर्धेत १२ संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. जागतिक क्रमवारीनुसार अव्वल दहा संघ आधीच निश्चित झाले आहेत. पण, यातील नवव्या व दहाव्या स्थानावरील संघ सुपर बाराच्या उर्वरित चार स्थानांसाठी अन्य ६ संघांविरुद्ध खेळावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, माजी विजेत्या श्रीलंका संघाला बांग्लादेशसह साखळी फेरीत खेळावे लागणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी आयसीसीने केलेले दोन गट असे आहेत -
गट १ - पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, गट A विजेता, गट B उप-विजेता
गट २ - भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, गट A उप-विजेता, गट B विजेता
आयसीसीने प्रवेश निश्चित असलेले संघ -
पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ( यजमान), दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान
सुपर बारासाठीच्या चार जागांसाठी या संघात आहेत चुरस
श्रीलंका, बांगलादेश, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान
आगामी ऑस्ट्रेलियात पार पडणारी विश्वकरंडक स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. भारत- आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान वेगवेगळ्या गटात असल्याने, त्यांचा सामना साखळी फेरीत होणार नाही.