मुंबई - बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी कडक नियमावली तयार केली आहे. जर कोणत्याही खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाला त्याला इंग्लंड दौर्यातून बाहेर केलं जाणार आहे. हे लक्षात घेऊन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम सुंदर यांनी आपल्या मुलाला या धोकादायक विषाणूपासून वाचविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
वॉशिंग्टनच्या वडिलांनी मुलापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते १९ मे पर्यंत दूर राहणार आहेत. कारण इंग्लंडला जाणारे सर्व खेळाडू १९ तारखेला मुंबईत जमणार आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम. सुंदर हे चेन्नईमधील प्राप्तिकर विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला जावे लागत आहे. अशात चेन्नईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे एम सुंदर हे त्यांच्या मुलासोबत एकाच घरात राहत नाहीत.
वॉशिंग्टनचे वडील आता दुसर्या घरात राहत आहेत. आपल्या कुटुंबाशी ते ऑनलाईन संवाद साधत आहेत. एम. सुंदर यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितलं की, वॉशिंग्टन आयपीएलमधून खेळून आल्यापासून मी एका वेगळ्या घरात राहत आहे. माझी पत्नी आणि मुलगी वॉशिंग्टनसोबत राहत आहेत. मी त्यांना फक्त व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतो. मला आठवड्यातून काही दिवस ऑफिसला जावे लागते. माझ्यामुळे आमच्या घरातील कुणालाही कोरोना संसर्ग होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळेच मी माझ्या कुटुंबियांपासून दूर राहत आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर रवाना होईल. या दौर्यात भारतीय संघ १८ जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
हेही वाचा - India Tour Of England : इंग्लंड दौऱ्यासाठी 'हा' शिलेदार झाला 'फिट'