कोलंबो - क्विंटन डी कॉकच्या नाबाद 58 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा दुसऱ्या टी-20 सामन्यात 9 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 104 धावांचे लक्ष्य 14.1 षटकातच पूर्ण केले. दक्षिण आफ्रिका संघाने या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय अंगाशी आला. श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज दिनेश चांदीमल दुसऱ्या षटकात 5 धावांवर बाद झाला. यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. ती थांबलीच नाही.
कुशल परेराने 25 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षे याने 13 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 20 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचा संघ 18.1 षटकात 103 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेज शम्सी आणि एडम मार्करम यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद करत श्रीलंकेची फलंदाजी कापून काढली.
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचे माफक आव्हान 14.1 षटकात 1 गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. क्विंटन डी कॉकने 7 चौकारासह नाबाद 58 धावांची खेळी केली. तर रिजा हेंड्रिक्सने 18 धावांचे योगदान दिले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. यानंतर डी कॉकने दुसऱ्या विकेटसाठी एडम मार्करम सोबत नाबाद भागिदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उभय संघातील तिसरा टी-20 सामना 14 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा - भारतीय टेनिसपटूंची पाकिस्तानमध्ये शाही बडदास्त, शाकाहारी जेवणापासून मिळत आहेत 'या' खास सुविधा
हेही वाचा - IPL 2021: मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...