लंडन - भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी डरकाळी फोडली आहे. त्याने, भारतीय संघ कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटलं आहे.
चेतेश्वर पुजारा बीसीसीआय टीव्हीशी बोलताना म्हणाला की, 'अंतिम सामन्याआधी दोन कसोटी सामन्याची मालिका खेळल्याने, नक्कीच न्यूझीलंड संघाला फायदा झाला आहे. न्यूझीलंडने ही मालिका १-० ने जिंकली. पण जेव्हा अंतिम सामन्याची बाब येते तेव्हा आम्ही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू. आम्हाला कल्पना आहे की, आमच्या संघात चांगलं प्रदर्शन करणे आणि चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे.'
आम्हाला अंतिम सामन्याच्या तयारीसाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी मिळाला. या कारणाने आम्ही चिंता करत नाही. मिळालेल्या वेळेत आम्ही एकाग्र राहून प्रयत्न करू. आम्ही एक सराव सामनाही खेळला. जर आम्ही मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला तर आमचा संघ अंतिम सामन्यातील आव्हानासाठी तयार राहिल, असे देखील पुजारा म्हणाला.
इंग्लंडमध्ये नेहमी हवामान बदलत असते. यात फलंदाजी करणे नेहमी आव्हान ठरते. याविषयी पुजारा म्हणाला, येथे एकाच दिवसात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळणे फलंदाजासाठी आव्हानात्मक ठरते. कारण पाऊस आला तर तुम्हाला मैदानाबाहेर जावं लागतं आणि अचानक पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सुरूवात करावी लागते.
माझ्यासाठी अंतिम सामना खूप महत्वाचा आहे. कारण मी कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. कसोटी क्रिकेट हे आव्हानात्मक आहे. आमच्या संघाने अंतिम फेरी गाठण्यासाठी खूप कष्ट घेतले असल्याचे देखील पुजारा म्हणाला. दरम्यान, पुजारा भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज असून त्याने ८५ कसोटी सामन्यात खेळताना ६ हजार २४४ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - सचिन तेंडुलकरने केलं रक्तदान, सांगितला जवळच्या व्यक्तीचा आलेला अनुभव
हेही वाचा - WTC फायनल : विजेत्याला मिळणार तब्बल 'इतकी' रक्कम