मुंबई - भारतीय क्रिकेट बोर्डाने बंगळुरूमध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी सद्याचे प्रमुख राहुल गांधी पुन्हा एकदा अर्ज करण्याची शक्यता आहे. भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या द्रविड यांना जुलै 2019 मध्ये एनसीएच्या प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी याआधी भारत अंडर-19 आणि भारत अ संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे.
त्यांचा दोन वर्षांचा करार संपला आहे आणि नियमानुसार बीसीसीआय या पदासाठी अर्ज मागवले आहेत. राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अखेरची तारिख 15 ऑगस्ट आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की, राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करण्याची शक्यता आहे. टी-20 विश्व करंडक स्पर्धेनंतर नोव्हेंबर 2021 मध्ये रवी शास्त्री यांचा कार्यकाल समाप्त होणार आहे. अशात राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे.
भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. यामुळे राहुल द्रविड यांनी श्रीलंका दौऱयावर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची भूमिका पार पाडली. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदाविषयी राहुल द्रविड यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी याविषयी मी काही विचार केला नसल्याचे सांगितलं होतं.
मुख्य प्रशिक्षक पदासाठी 60 वर्षाची वयोमर्यादा आहे. शास्त्री मे महिन्यात 59 वर्षाचे झाले आहेत. जर भारतीय संघाची टी-20 विश्व करंडक स्पर्धेत कामगिरी चांगली राहिली नाही तर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत येऊ शकतात.
हेही वाचा - सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने त्याच्या करियरमधील टर्निंग पाँईंट सांगितला
हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार