मुंबई - बीसीसीआयने आपला खेळाडूंसोबतचा वार्षिक करार घोषित केला आहे. हा करार ऑक्टोबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. यात काही खेळाडूंचे पगार वाढले आहेत तर काही खेळाडूंची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली.
बीसीसीआयच्या वार्षिक करारात चार श्रेण्या केल्या जातात. अ+ , अ, ब आणि क अशा चार श्रेण्या असतात. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय गोलंदाजीचा स्तंभ जसप्रीत बुमराह यांना अ+ श्रेणीत स्थान कायम ठेवण्यात आले आहे. या तिघांचा पगार ७ कोटी रुपये इतका असणार आहे.
हार्दिक पांड्याची 'ब' गटातून 'अ' गटात बढती झाली आहे. तर आर अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल , मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांनी 'अ' गटात आपले स्थान कायम ठेवले आहे. तर भुवनेश्वर कुमार याची 'अ' गटातून 'ब' गटात घसरगुंडी झाली आहे. 'अ' गटातील खेळाडूंचा पगार ५ कोटी रुपये इतका असतो.
वृद्धीमान साहा, उमेश यादव आणि मयांक अग्रवाल हे 'ब' गटात कायम आहेत. तर शार्दुल ठाकूर याची 'क' गटातून 'ब' गटात एंन्ट्री झाली आहे. 'ब' गटातील खेळाडूंना ३ कोटी रुपये इतका पगार असतो.
शुबमन गिल, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना 'क' श्रेणीत नव्याने जागा मिळाली आहे. तर युझवेंद्र चहलची एका गटाने घसरण झाली आहे. 'क' गटात कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, वाशिंग्टन सुंदर यांनी श्रेणी कायम राखली गेली आहे. 'क' गटाचा पगार १ कोटी इतका असतो. तर मनीष पांडे आणि केदार जाधव यांना करारमुक्त करण्यात आले आहे.
कोणत्या गटात कोणते खेळाडू - (पगार)
- अ+ गट- विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह. (७ कोटी)
- अ गट- हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत. (५ कोटी)
- ब गट- भुवनेश्वर कुमार, वृद्धीमान सहा ,उमेश यादव ,मयांक अग्रवाल, शार्दूल ठाकूर. (३ कोटी)
- क गट- शुबमन गिल, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर , हनुमा विहारी , श्रेयस अय्यर , वॉशिंग्टन सुंदर. (१ कोटी)
हेही वाचा - विस्डेन पुरस्कार : विराट कोहली गेल्या दशकाचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू
हेही वाचा - IPL 2021 :CSK vs PBKS : दोन्ही किंग्जमध्ये चेन्नईच 'सुपर', पंजाबवर ६ विकेट्सनी मात