मेलबर्न ( ऑस्ट्रेलिया ) : ऑस्ट्रेलियाचा टी20आय कर्णधार अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने याआधी १० सप्टेंबरला ‘वन डे’ मधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने न्यूझीलंडविरूद्धचा अखेरचा वन डे सामना खेळला होता. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी फिंचने पाच कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 सामने खेळून 254 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. आयसीसीने फिंचच्या हवाल्याने सांगितले की, 2024 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत मी खेळणार नाही, हे लक्षात घेऊन पद सोडण्याचा आणि संघाला त्या स्पर्धेसाठी योजना आखण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वेळ देण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मला खूप खूप आभार मानायचे आहेत, असे त्याने म्हटले आहे.
पुरस्कारासाठी नामांकन : फिंचने जानेवारी 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी20आयमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासून, फिंचने 8,804 धावा केल्या. 17 ODI शतके आणि दोन टी20आय शतकांचा यामध्ये समावेश आहे. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वन डे मधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु त्याने टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद चालू ठेवले. 2018मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध फक्त 76 चेंडूत 172 धावा केल्या, तेव्हा त्याने सर्वोच्च टी20आय धावसंख्येचा विक्रम केला होता. त्याच्या या अप्रतिम खेळीत 10 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. 2020 मध्ये, त्याला आयसीसी पुरुष टी20आय क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. फिंचने 2013मध्ये साउथ हॅम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूत केलेल्या 156 धावा या टी20आयमधील आतापर्यंतची तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताविरुद्ध खेळलेली शेवटची संस्मरणीय खेळी : नोव्हेंबर २०२० मध्ये, अॅरॉन फिंचने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्याने १२४ चेंडूत ११४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३७४ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ ३०८ धावाच करू शकला. भारताविरुद्ध फिंचची ही शेवटची आणि मोठी संस्मरणीय खेळी होती. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार फिंच, बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत राहणार आहे. २०२२ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघ फिंचच्या नेतृत्वाखाली टी-२० चे विजेतेपद वाचवू शकला नाही. त्यानंतर त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित झाले होते.
हेही वाचा : ICC Women T20 World Cup : महिला टी20 विश्वचषकासाठी संघांची घोषणा; पहा खेळाडूंची यादी