बँकॉक - भारतीय बॅडमिंटनपटू किंदाम्बी श्रीकांत थायलंडमध्ये सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. श्रीकांतला हाँगकाँगच्या अँगस एनजी का लाँगकडून २१-१२, १८-२१, १९-२१ अशी मात खावी लागली. स्पर्धेतील सलग तिसरा पराभव असल्यामुळे श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले आहे. हा सामना ६५ मिनिटे रंगला होता.
हेही वाचा - ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी संकटात...वाचा कारण
पहिल्या सेटमध्ये विजय मिळवल्यानंतर श्रीकांतवर प्रतिस्पर्धी खेळाडू वरचढ झाला. याआधीचे सामनेही श्रीकांतने असेच गमावले आहेत. त्याला पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या अँडर अँटोनसेनने हरवले. तर, दुसऱ्या सामन्यात तैवानच्या वांग झू वेने श्रीकांतवर १९-२१, २१-९, २१-१९ अशी सरशी साधली.
सलामीच्या संघर्षपूर्ण लढतीत सिंधू पराभूत
सिंधूने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या तैवानच्या ताय झु यिंगविरुद्ध कडवी झुंज दिली. पण तरीही तिला २१-१९, १२-२१, १७-२१ अशा फरकाने पराभव पत्कारावा लागला. सिंधूची पुढील फेरीत रॅटचानोक इन्टॅनॉनशी गाठ पडणार आहे. दरम्यान, ताय झु यिंगविरुद्ध झालेल्या २१ सामन्यापैकी हा सिंधूचा १६ वा पराभव ठरला आहे.