लखनऊ - सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात किदाम्बी श्रीकांत आणि सौरव वर्मा यांनी दुसऱ्या फेरीत मजल मारली. तर लक्ष्य सेन आणि साई प्रणीतचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.
किदाम्बी श्रीकांतने भारताच्याच पारुपल्ली कश्यपचा संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, २१-१६ असा पराभव केला. ६७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात कश्यपने श्रीकांत कडवी झुंज दिली. श्रीकांतचा पुढील सामना दक्षिण कोरियाचा के सोन वान यांच्याशी होणार आहे.
दुसरीकडे सौरभ वर्माने भारतीय अलाप मिश्राचा पराभव केला. सौरभने अवघ्या २८ मिनिटात २१-११, २१-१८ अशी बाजी मारली. सौरभसमोर पुढील फेरीत थायलंडच्या कुनलावत वितिदसर्न (Kunlavut Vitidsarn) चे आव्हान असेल.
भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनचा कोरियाचा खेळाडू सोन वॅन हो याने २१-१४, २१-१७ असा पराभव केला. या पराभवासह लक्ष्य सेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
साईप्रणीतचा थायलंडच्या कुनलावत वितिदसर्नने ११-२१, १७-२१ असा पराभव केला. दरम्यान, लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. तर साई प्रणीतने मलेशियाच्या इस्कांदर झुल्करनैनवर २१-१६, २२-२० असा विजय मिळवला होता.
लक्ष्य सेन, साईप्रणीतसह भारताच्या एस. एस प्रणॉय, अजय जयराम आणि शिरील वर्मा यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले आहे.
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!
हेही वाचा - पी. व्ही. सिंधू जगभरातील महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाई करणारी एकमेव भारतीय