नवी दिल्ली - यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हे भारतीय बॅडमिंटनसाठी मोठी कामगिरी असल्याचे सिद्ध झाले आहेत. या वर्षी बॅडमिंटन क्षेत्राने मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासह सहा पुरस्कार प्राप्त केले आहेत. खेळातील योगदानाबद्दल माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आणि सत्यप्रकाश तिवारी (पॅरा खेळाडू) यांना प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कार मिळाला आहे.
१९८२ च्या एशियन गेम्समध्ये गंधे यांनी दुहेरी प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. ते प्रकाश पादुकोण आणि सय्यद मोदी यांचे सहकारी राहिले आहेत, तर दोन वेळा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुरगुंडे या आपल्या तांत्रिक कौशल्यामुळे ओळखल्यात जातात.
पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत ९ आंतरराष्ट्रीय पदके जिंकणार्या तिवारींव्यतिरिक्त, पॅरा बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक गौरव खन्ना यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खन्ना यांच्यामुळे भारताने अनेक विजय मिळवले आहेत. यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेल्या सुवर्ण पदकाचाही समावेश आहे.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) सचिव अजय सिंघानिया म्हणाले, "प्रथमच ध्यानचंद पुरस्कार जिंकणे भारतीय बॅडमिंटनसाठी विशेष क्षण आहे. असे सन्मान आपल्याला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतात. बीएआय आणि त्याचे अध्यक्ष हिमांत बिस्वा शर्मा यांच्यातर्फे मी ध्यानचंद पुरस्कारासाठी निवडलेल्या तीन खेळाडूंचे आणि उर्वरित खेळाडूंचे अभिनंदन करतो. "
भारताची आघाडीची पुरुष दुहेरीची जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.