नवी दिल्ली - विश्व विजेत्या पी. व्ही. सिंधूला हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) आगामी हंगामासाठी आपल्या संघात कायम ठेवले आहे. मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या खेळाडू लिलावात हैदराबादने ७७ लाख रुपये इतकी रक्कम देत सिंधूला आपल्या संघात घेतले. तसेच महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्या चिनी तैपेईच्या ताई झू यिंगला गतविजेत्या बंगळुरू रॅप्टर्सने ७७ लाख रुपयांतच खरेदी केले. सिंधू आणि यिंग यंदाच्या लिलावात सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या.
सिंधूला हैदराबाद हंटर्सने संघात कायम राखले, तर गतविजेत्या बंगळुरू रॅप्टर्सने लिलावात पुणे ७ एसेस संघावर मात करत चायनीज तैपेईच्या ताय झुला संघात घेतले. जागतिक स्पर्धेत कांस्यपकद जिंकणाऱ्या बी. साई प्रणितला बंगळुरू रॅप्टर्सने ३२ लाख रुपये खर्चत संघात घेतले.
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीसाठी चेन्नई सुपरस्टार्सने ६२ लाख रुपये मोजले. बी. सुमित रेड्डीसाठी चेन्नईने ११ लाख आणि चिराग शेट्टीसाठी पुण्याने १५.५० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले.
राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या गायत्री गोपीचंदला चेन्नईने संघात स्थान दिले. तसेच आसामची युवा खेळाडू अश्मिता छलिहाला नॉर्थ इस्टर्न वॉरियर्सने ३ लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतले.
दरम्यान, पीबीएलचा पाचवा हंगाम २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १५४ खेळाडूंपैकी ७४ भारतीय आहेत.
पीबीएल स्पर्धेच्या पाचव्या हंगामातून भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने माघार घेतली आहे. सायनासह पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांतही या स्पर्धेत खेळणार नाही.
हेही वाचा - सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियनशीप : स्पर्धा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच सायनाने घेतली माघार
हेही वाचा - बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न