ओडेंस (डेन्मार्क) - भारताचा स्टार युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन डेन्मार्क ओपन सुपर ७५०च्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कोरोना विषाणूमुळे सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर लक्ष्यने कोर्टवर पुनरागमन केले होते. लक्ष्यला स्थानिक स्पर्धक ख्रिस्टियन सोलबर्ग विटिंग्ज विरुद्ध २१-१५, ७-२१, १७-२१ अशी मात पत्करावी लागली.
यापूर्वी, लक्ष्यने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हचा २१-९, २१-१५ असा सरळ पराभव करत दुसरी फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या सेनने ३६ मिनिटांत हा सामना जिंकला होता.
दुसरीकडे भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने जेसन अँथनी हो शुईचा सरळ गेममध्ये पराभव करत डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. पाचव्या मानांकित श्रीकांतने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला श्रीकांतचा पुढील सामना चिनी तैपेईच्या द्वितीय मानांकित टीएन चेन चाउशी होईल.
शुभंकर डे आणि अजय जयराम यांना पहिल्या फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.