कोपेनहेगन - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
६२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात श्रीकांतला चीनी तैपेईच्या टीएन चेन चाउकडून २२-२०, १३-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनही डेन्मार्क ओपन सुपर ७५०च्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कोरोना विषाणूमुळे सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर लक्ष्यने कोर्टवर पुनरागमन केले होते. लक्ष्यला स्थानिक स्पर्धक ख्रिस्टियन सोलबर्ग विटिंग्ज विरुद्ध २१-१५, ७-२१, १७-२१ अशी मात पत्करावी लागली.
किदांबी श्रीकांतने जेसन अँथनी हो शुईचा सरळ गेममध्ये पराभव करत डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली होती. पाचव्या मानांकित श्रीकांतने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. शुभंकर डे आणि अजय जयराम यांना पहिल्या फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.