नवी दिल्ली - भारताचा पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सालॉरलक्स ओपनमधून आपले नाव मागे घेतले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) बुधवारी ही माहिती दिली. लक्ष्यचे प्रशिक्षक डीके सेन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे लक्ष्यने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. लक्ष्यला या स्पर्धेतील दुसरे मानांकन मिळाले होते. पहिल्या फेरीत त्याला मलेशियाच्या हॉवर्ड शुचा सामना करावा लागणार होता.
प्राधिकरणाने सांगितले, "लक्ष्यचे प्रशिक्षक सेन आणि फिजिओ जर्मनीच्या सार्वक्रेन येथे दाखल झाले होते. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांना फ्रँकफर्टला जाण्यास सांगण्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी लक्ष्य व फिजिओ यांची चाचणी निगेटिव्ह आली. परंतू प्रशिक्षक सेन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला."
''त्यामुळे या स्पर्धेला अडथळा आणू नये आणि इतर खेळाडूंना अडचणीत येऊ नयेत म्हणून लक्ष्यने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने आयोजकांना याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या प्रशिक्षकाने दुसर्या कोरोना चाचणीसाठी अपील केले आहे. जेणेकरून तो भारतात परत येऊ शकेल", असेही प्राधिकरणाने सांगितले आहे. शुभंकर डे आणि अजय जयराम हे या स्पर्धेत खेळणार आहेत.