नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठीच्या तीन पात्रता स्पर्धांपैकी एक आहे. दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
'सुपर ५००' दर्जाची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ११ ते १६ मे या कालावधीत नवी दिल्लीमधील बंदिस्त संकुलात आयोजित करण्यात येणार होती. परंतु दिल्लीतील सद्यस्थिती पाहता, स्पर्धा लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही, असे संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.
जागतिक बॅडमिंटन महासंघ, दिल्ली सरकार आणि अन्य भागधारकांशी खेळाडूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आमच्या अनेक बैठका झाल्या. यानंतर संघटनेने स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सिंघानिया यांनी दिली.
दरम्यान, २०२० मधील इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आधी मार्चऐवजी डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. नंतर ती रद्द करण्यात आली. 'ही स्पर्धा दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्याची नामुष्की ओढवली आहे. परंतु परिस्थिती सुधारल्यावर आम्ही स्पर्धा घेणार आहोत. नव्या तारखा ठरवण्यात आलेल्या नाहीत. जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून त्या कळवण्यात येतील, असे सिंघानिया यांनी सांगितले.
हेही वाचा - ज्वाला गुट्टाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अभिनेता विशालसोबत बांधणार लग्नगाठ
हेही वाचा - बीडब्ल्यूएफ ११ गुणांचे पाच गेम खेळवण्याचा विचारात