पॅरिस - भारतीय बॅडमिंटन (पुरुष दुहेरी) जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. या पराभवाबरोबर या जोडीचे विजेतेपदाचे स्वप्नं भंगले आहे. अंतिम सामन्यात या जोडीला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या केविन सुकामुलजो आणि मार्कस फर्नाल्डी या जोडीने पराभव केला.
रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीने भारतीय जोडीचा अवघ्या ३५ मिनिटात २१-१८, २१-१६ ने पराभव केला. महत्वाचे म्हणजे, इंडोनेशियाच्या याच जोडीने मागील वर्षी सात्विक-चिराग जोडीचा पराभव केला होता.
पुरुष दुहेरी गटात केविन-सुकामुलजो ही जोडी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थांनी मागील १२१ आठवड्यांपासून विराजमान आहे. तर भारतीय सात्विक-चिराग जोडी क्रमवारीत ११ व्या स्थानावर असून भारतीय जोडीला अद्याप एकदाही इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव करता आलेला नाही.
दरम्यान, भारतीय जोडीने उपांत्य सामन्यात पाचव्या मानांकित जपानच्या हिरोयुकी इंडो व युटा वतानाबेचा २१-११, २५-२३ असा पराभव केला होता. हा सामना ५० मिनीटांपर्यंत रंगला होता. यामुळे भारतीय जोडीकडून विजेतेपदाच्या आशा होत्या. मात्र, इंडोनेशियाची जोडी वरचढ ठरली आणि सात्विक-चिरागला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस