ओडेन्से (डेन्मार्क) : - जगज्जेती पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपन स्पर्धेत मंगळवारी विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुंजुंगचा पराभव केला. हा सामना रोमांचक ठरला. मात्र, यात सिंधूने २२-२०, २१-१८ ने बाजी मारत या खेळाडूविरुद्धचा शंभर टक्के विजयाचा रेकॉर्ड कायम राखला.
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सिंधूला माजी विश्व ज्युनिअर चॅम्पियन इंडोनेशियाच्या खेळाडूने पहिल्या फेरीत चांगलेच झुंजवले. पहिला गेम अटातटीचा ठरला. यात मोक्याच्या क्षणी सिंधूने बाजी मारत २२-२० ने बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये ग्रेगोरिया मारिस्का तुंजुंगने पलटवार करण्याचा प्रयत्न केला मात्र, तिची झुंज अपयशी ठरली आणि दुसरा गेम २१-१८ ने गमावला.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सिंधूला चीन ओपन आणि कोरिया ओपन स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, सिंधू या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मागील अपयश धुवून काढण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, तिचा पुढीला सामना कोरियाच्या अन से यंगशी होणार आहे.
पुरूष गटात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बी. साई प्रणीतने शानदार विजय मिळवला. त्याने पहिल्या फेरीत दिग्गज चीनच्या लिन डॅन याचा ३५ मिनिट रंगलेल्या लढतीत २१-१४, २१-१७ ने पराभव केला. त्याला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला व दोनवेळा जगज्जेता ठरलेल्या जपानच्या केंटो मोमोटाच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. स्वित्झर्लंडमध्ये अलीकडेच झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये मोमोटाने प्रणीतला पराभवाचा धक्का दिला होता.
पुरूष दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी विजयी प्रारंभ केला आहे. त्यांनी कोरियाच्या किम जी जुंग व ली योग डेई या जोडीचा २४-२२, २१-११ ने पराभव केला.
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी