ग्वांगजो - 'बीडब्ल्यूएफ' वर्ल्ड टूर फायनलच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पी. व्ही. सिंधूने अ गटातील तिसऱ्या आणि अखेरच्या साखळी लढतीत विजय मिळवला. तिने चीनच्या ही बिंग जियाओला रंगतदार लढतीत नमवले. या विजयासह तिने वर्षाअखेरच्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सांगता केली.
सिंधूला सलग दुसऱ्या पराभवानंतर आपले जेतेपद टिकवता येणार नाही, हे स्पष्ट झाले होते. मात्र तिसऱ्या सामन्यात सिंधूने बिंग जियाओचा 21-19, 21-19 असा पराभव केला. तिला अ गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, सिंधूने बिंग जियाओविरुद्धची सलग चार पराभवांची मालिका खंडित केली आहे.
पहिल्या गेममध्ये बिंग जियाओने आक्रमक खेळ केला. तिने सुरूवातीला 7-3 अशी आघाडी घेतली त्यानंतर हाच धडाका कायम राखत ती 11-6 ने आघाडी वाढवली. सिंधूच्या चुकांमुळे बिंग जियाओने 18-9 अशा फरकाने आघाडी घेत पहिला गेम जिंकण्याकडे वाटचाल केली. परंतु सिंधूने दमदार पुनरागमन करताना नऊ सलग गुण मिळवत 18-18 अशी अनपेक्षित बरोबरी साधली. मग बिंग जियाओनेही 19-19 अशी बरोबरी साधली. परंतु सिंधूने संधी निसटू न देता दोन सलग गुणांनिशी पहिला गेम खिशात घातला.
पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्ये चांगली सुरूवात केली. तिने जियाओला जेरीस आणत 11-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर बिंग जियाओच्या हातून चुका झाल्यामुळे सिंधूने विजयाच्या दिशेने 15-10 अशी वाटचाल केली. परंतु बिंग जियाओने आक्रमक रुप अवलंबले तिने गुणांची दरी 16-18 अशी कमी केली. मात्र, सिंधूने जिद्दीने खेळत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.
'बीडब्ल्यूएफ' वर्ल्ड टूर फायनलमध्ये सिंधूची कामगिरी
03 सामने 01 विजय 02 पराभव