नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा उपक्रम मार्चपासून स्थगित आहेत. तीन महिन्यानंतरही अनेक स्पर्धांबाबत खबरदारी घेतली जात आहे. काही खेळ पुन्हा सुरू केले गेले असले तरी बॅडमिंटनवर कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम आहे. अशातच योग्य तारखा न मिळाल्यामुळे वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) बुधवारी स्विस ओपन व युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धा रद्द केली आहे.
“यावर्षी बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक पुन्हा तयार करण्यात आले असून योनेक्स स्विस ओपन 2020 आणि 2020 युरोपियन चॅम्पियनशिप आता रद्द करण्यात आली आहे'', अशी माहिती बीडब्ल्यूएफने दिली.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बीडब्ल्यूएफने 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणारी हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धाही रद्द केली आहे. ही स्पर्धा बीडब्ल्यूएफच्या सुधारित वेळापत्रकाचा एक भाग होती.
हैदराबाद ओपनशिवाय ऑस्ट्रेलियन ओपन, कोरिया मास्टर्स स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.