हैदराबाद : प्रसिद्ध तेलुगु अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना इतर कोणताही विकार नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. आज पहाटे तेलंगाणाच्या गुंटूर जिल्ह्यामध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तेलुगु अभिनेता सुधीर बाबू याने ट्विट करत रेड्डींच्या निधनाबाबत माहिती दिली. त्यानंतर तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख, एन. चंद्राबाबू नायडू यांनी रेड्डींच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. तेलुगु सिनेमा आणि नाट्यसृष्टीने आज एक हिरा गमावलाल आहे. आपल्या बहुरंगी अभिनयाने कित्येक दशके त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या दुःखद प्रसंगी माझ्या सद्भावना रेड्डींच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे नायडू म्हणाले.
जयप्रकाश रेड्डी हे आपल्या विनोदी भूमीकांसाठी प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी रंगवलेली खलनायकी पात्रेही प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. तेलुगु सिनेमे इतर भाषांमध्ये डब होण्यास सुरुवात झाल्यापासून देशभरात ते प्रसिद्ध झाले होते. तेलुगु सिनेसृष्टीमध्ये त्यांना 'जेपी' नावाने ओळखले जात. तेलुगुमधील कित्येक मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे.