मुंबई - मराठी आणि हिंदी सिनेमात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेले अभिनेते म्हणजे विजय पाटकर. ते आता तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. 'दहा बाय दहा' या नाटकातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग उद्या (६ एप्रिल) मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात पार पडणार आहे.
'दहा बाय दहा' या नाटकातून एका मध्यमवर्गीय चौकट मोडू पाहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची गोष्ट मांडण्यात येणार आहे. विजय पाटकर हे या नाटकात कुटूंबप्रमुख 'मोहन घाडीगांवकर' यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर, अभिनेता प्रथमेश परब हा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री सुप्रिया पठारे या त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत असून नवोदित अभिनेत्री विदीशा म्हैसकर ही त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

या नाटकाची निर्मिती दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करत आहेत. तर, अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शनीय धुरा सांभाळली आहे. संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी हे नाटक लिहिलं आहे. तर सचिन नारकर, विकास पवार आणि आकाश पेंढारकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.
आजवर अनेक उत्तमोत्तम सिनेमांमधून आणि रोहित शेट्टीच्या सिनेमात कॉमेडी करताना पाटकर यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवल आहे. आता हिच किमया रंगभूमीवर दाखवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. आता त्यांचा अभिनय 'दहा बाय दहा'च्या टीव्हीवर मालिका पाहून खुश होणाऱ्या मराठी प्रेक्षकाला या चौकटीतून बाहेर काढून नाटकाकडे खेचण्यात यशस्वी होतो का, हे पाहणे रंजक ठरेल.