वॉशिंग्टन - जगातील सर्व महत्त्वाचे आंतरराष्ट्री फिल्म फेस्टीव्हल कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे एकतर रद्द झाले आहेत किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र जगात सर्वात जास्त काळ चालणारा व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल ठरलेल्या वेळेत सप्टेंबरमध्ये पार पडणार आहे.
व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन २ ते १२ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेटो गव्हर्नर लुका झाइया यांनी फिल्म फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. हा फिल्म फेस्टिव्हल होणार असला तरी यंदा नेहमीपेक्षा कमी चित्रपट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
इटलीमध्ये कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे यंदाचा व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल होणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र ठरल्यावेळेनुसार हा फेस्टिव्हल पार पडणार आहे. कोरोनामुळे इटलीच्या सीमा बंद आहेत. जून महिन्यात या सीमा खुल्या केल्या जातील. परदेशातून इटलीमध्ये येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनचे बंधन न ठेवता प्रवेश दिला जाणार आहे.