मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका असलेली मालिका ‘अजूनही बरसात आहे' च्या प्रोमोजनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. आता या मालिकेचं शीर्षकगीत बाहेर येतंय जे गायलंय सुप्रसिद्ध गायिका गायक जोडी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. सोनी मराठी प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिकांची मेजवानी सातत्यानी घेऊन येत असते आणि त्यात आता 'अजूनही बरसात आहे' या नव्या मालिकेची भर पडली आहे. त्यातच सोनी मराठीच्या मालिकांच्या शीर्षक गीतांची नेहमी चर्चा होत असते त्यात भर पडणार आहे ‘अजूनही बरसात आहे' च्या शीर्षकगीताची.
चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्याने टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक ‘मॅच्युअर्ड’ प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा निर्माते व्यक्त करीत आहेत.
'अजूनही बरसात आहे' मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनी शीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.
'अजूनही बरसात आहे' ही नवीन मालिका १२ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी